देवकुंड धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर भीषण दरड कोसळली!
कालच झाली होती बंदी आदेशाची ऐशेशी थट्टा; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

माणगाव – देवकुंड परिसरात खळबळ; निसर्गाचा हुल्लडबाजांना आणि प्रशासनाला मोठा इशारा!
गोरेगांव / रोहिदास नगर (प्रसाद गोरेगांवकर ) माणगाव आणि देवकुंड परिसरातून या घडीची एक अत्यंत मोठी आणि काळजात धस्स करणारी बातमी समोर येत आहे. देवकुंड धबधब्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर भीषण दरड कोसळली आहे! संपूर्ण रायगड जिल्ह्याला हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ दिला असतानाच ही मोठी दुर्घटना घडली असून, डोंगरकडा खचून मातीचा भलामोठा ढिगारा थेट रस्त्यावर आला आहे.

आज सोमवार असल्याने आणि परिसरात मुसळधार अतिवृष्टी होत असल्यामुळे सुदैवाने मार्गावर पर्यटक नव्हते. याच कारणाने आज एक अत्यंत मोठी जीवितहानी आणि भीषण अनर्थ टळला आहे!
कालच उडाली होती प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाची ‘ऐशेशी’ थट्टा!
या दुर्घटनेनंतर एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बाब समोर आली आहे. कालच, म्हणजेच रविवारी (५ जुलै) पर्यटकांनी आणि काही स्थानिक घटकांनी प्रांताधिकारी संदिपान सानप यांच्या बंदी आदेशाची अक्षरशः पायमल्ली केली होती. पोलिसांना ‘चॉकलेट’ देऊन देवकुंडवर पर्यटकांची तुफान गर्दी जमली होती.
प्रशासनाचा धाक आणि नियमांना केराची टोपली दाखवून काल जी हुल्लडबाजी सुरू होती, त्याला आज निसर्गानेच सणसणीत चपराक दिली आहे.
…तर आज शेकडो निष्पापांचे बळी गेले असते!
या भीषण घटनेने काल हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांच्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या स्थानिक यंत्रणेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. जर ही दरड काल रविवारी, त्या तुफान गर्दीच्या वेळी कोसळली असती, तर आज परिस्थिती काय असती? किती निष्पापांचे बळी गेले असते? याचा विचारही करवत नाही. आज केवळ ‘सोमवार’ होता आणि पाऊस जास्त असल्याने पर्यटक फिरकले नाहीत, म्हणून शेकडो तरुण सुखरूप वाचले आहेत.
निसर्गाचा इशारा समजून घ्या!
निसर्ग वारंवार धोक्याची घंटा वाजवून इशारा देत असतो. प्रांताधिकाऱ्यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून ३० सप्टेंबरपर्यंत देवकुंड परिसरात लावलेली बंदी ही केवळ ‘कागदी घोडे’ नसून पर्यटकांच्याच जिवाच्या संरक्षणासाठी आहे, हे आता तरी सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. जिवाशी खेळून केली जाणारी ही पर्यटनाची हौस किती महागात पडू शकते, याचे हे जिवंत उदाहरण आहे.



