देवकुंड, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट परिसरात ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी!
कलम १६३ अंतर्गत आदेश लागू

गोरेगांव / रोहिदास नगर ( प्रसाद गोरेगांवकर ) हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी केला आहे. नदी-नाल्यांना येणारा पूर आणि दरडी कोसळण्याचा थेट धोका असतानाही, माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध ‘देवकुंड’ धबधब्यावर पर्यटकांची बेफाम हुल्लडबाजी आणि गर्दी राजरोसपणे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासन सरसावले आहे. माणगाव उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत या संपूर्ण परिसरात ३० सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करत पर्यटकांना पूर्णपणे बंदी घातली आहे.
पूर्वीच्या दुर्दैवी घटनांमुळे प्रशासन सतर्क
या परिसरात यापूर्वी अनेक निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सन २०१७ मध्ये नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने ४ पर्यटकांचा मृत्यू झाला होता, तर ५५ पर्यटक नदीपात्रात अडकले होते. त्यानंतर २०१८ मध्ये ३, तर २०२२ मध्येही एका पर्यटकाचा येथे बळी गेला होता. हाच धोका ओळखून प्रशासनाने भिरा आणि उन्नई धरणाच्या आसपास ५०० मीटरच्या परिसरात पर्यटकांना येण्यास आणि वाहने आणण्यास सक्त मनाई केली आहे.
स्थानिक यंत्रणेची डोळेझाक आणि छुप्या पर्यटनाचा सुळसुळाट?
प्रशासनाने कागदावर बंदी आणली असली, तरी जमिनीवरील वास्तव अत्यंत धक्कादायक आहे. बंदी असलेल्या ५०० मीटर क्षेत्रात स्थानिकांनी दुकाने आणि टपऱ्या थाटल्या आहेत. पर्यटक धरणाच्या अगदी कडेला जीव मुठीत धरून फिरत आहेत. विशेष म्हणजे, देवकुंडकडे जाणाऱ्या मार्गांवर पर्यटकांकडून पार्किंगच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा दराने उघडपणे आर्थिक वसुली केली जात आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या नाकाखाली हा सर्व प्रकार सुरू असतानाही कोणतीही ठोस कारवाई केली जात नाहीये. स्थानिक पुढाऱ्यांचा दबाव आणि ३-४ महिन्यांच्या उदरनिर्वाहाचे ‘आर्थिक गणित’ बिघडू नये म्हणून मानवी जिवाच्या सुरक्षिततेकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याचा गंभीर आरोप आता होऊ लागला आहे.
🚫 या गोष्टींवर असेल पूर्णपणे बंदी:
पर्यटकांच्या हुल्लडबाजीला चाप लावण्यासाठी प्रशासनाने खालील गोष्टींवर तात्काळ बंदी घातली आहे:
-
🍾 धबधब्यांच्या परिसरात मद्यपान करणे, मद्य बाळगणे किंवा त्याची विक्री करणे.
-
📸 धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे, फोटो आणि चित्रीकरण करणे.
-
🏊 वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे किंवा पोहणे.
-
⛰️ धबधब्याच्या माथ्यावर जाणे किंवा पाण्याच्या तीव्र झोताखाली बसणे.
-
🚗 धरण, तलाव आणि धबधब्याच्या १ किलोमीटर परिसरात खासगी वाहनांना प्रवेश (अत्यावश्यक सेवा वगळून).
-
🗑️ परिसरात कचरा, प्लास्टिक व काचेच्या बाटल्या फेकणे.
-
🤬 महिलांची छेडछाड, अश्लील वर्तन किंवा टिंगलटवाळी.
-
📢 मोठ्या आवाजात डीजे, स्पीकर किंवा ध्वनीप्रदूषण करणारी साधने वाजवणे.
प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना या आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.



