वाळण येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न; माजी आमदार शरद खातू यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
महाड वन परिक्षेत्राचा उपक्रम; २७ विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप

पुरार ( प्रतिनिधी – रिजवान मुकादम ) : महाड वन परिक्षेत्र (रेंज) व दापोली परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या वाळण येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत १ जुलै ते ७ जुलै या ‘वृक्षारोपण सप्ताहा’चे औचित्य साधून विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. हा वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
रोहा विभागाचे उपवनसंरक्षक व सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाड रेंजचे वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) श्री. आशिष पाटील यांच्या विशेष नियोजनातून १ ते ७ जुलै या कालावधीत अनेक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून वाळण येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
निसर्ग आणि वनांचे महत्त्व अधोरेखित
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वन वणवा, वन्यप्राणी आणि वन्यजीव संरक्षण यांचे मानवी जीवनातील महत्त्व यावर सविस्तर माहिती देण्यात आली. याप्रसंगी श्री. भीमराव सूर्यतळ यांनी वनांचे महत्त्व सांगणारे एक सुंदर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तत्पूर्वी, मेजर निवाते यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे ‘एक वृक्ष’ देऊन पर्यावरणपूरक स्वागत केले.
शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमासोबतच सामाजिक भान जपत वाळण शाळेतील २७ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वह्या आणि पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन
या वृक्षारोपण सोहळ्याला माजी आमदार शरद खातू, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार खातू, सरपंच श्रीमती श्वेता भगत, माजी सरपंच सुभाष खातू, ज्येष्ठ नागरिक पांडुरंग उत्तेकर, शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश मोटे सर यांच्यासह अनेक स्थानिक मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी आमदार शरद खातू यांनी हवा, पाणी, आरोग्य आणि निसर्गाचा समतोल राखणे किती गरजेचे आहे, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मेजर निवाते यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.



