काठमांडूत फडकवला तिरंगा! तळ्याच्या नववीतील चैतन्य पितळेची आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी

तळा ( किशोर पितळे ) खेळातील अफाट जिद्द, कठोर मेहनत आणि कौटुंबिक पाठबळाच्या जोरावर तळा तालुक्यातील नववीच्या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतात भारताची मान उंचावली आहे. काठमांडू (नेपाळ) येथे पार पडलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२६ मध्ये कु. चैतन्य स्मिता योगेश पितळे याने उत्कृष्ट कामगिरी करत ‘सिल्व्हर मेडल’ (रौप्य पदक) पटकावले आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे तळा तालुक्याच्या आणि दैवज्ञ ब्राह्मण सोनार समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
केवळ इयत्ता नववीत शिकणाऱ्या चैतन्यला बालपणापासूनच कराटे आणि बॉक्सिंग यांसारख्या मार्शल आर्ट्सची प्रचंड आवड होती. हीच आवड ओळखून त्याला ॲकॅडमीत दाखल करण्यात आले. एका बाजूला अभ्यासाचे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला मैदानातील घाम गाळणारा सराव, अशा कठीण परिस्थितीत त्याने आपली शिस्त ढळू दिली नाही. या संपूर्ण प्रवासात त्याच्या आईने अत्यंत खंबीरपणे पाठीशी उभे राहत त्याला मार्गदर्शन व आवश्यक ते आर्थिक पाठबळ पुरवले.
“योग्य मार्गदर्शन, आई-वडिलांचे आशीर्वाद आणि सातत्यपूर्ण मेहनत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही,” हेच चैतन्यने या यशातून दाखवून दिले आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशामुळे तळा तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले असून, मित्रपरिवार, स्थानिक लोकप्रतिनिधी, क्रीडाप्रेमी आणि दैवज्ञ ब्राह्मण सोनार समाजाच्या वतीने त्याच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



