कु. स्वरा गायकवाड हिचा “नामदार नाना शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्ती” देऊन विशेष गौरव

तळा ( किशोर पितळे ) भिमकन्या कु. स्वरा प्रकाश गायकवाड हिने एस्.एस्.सी. माध्यमिक शालांत परीक्षेत संस्कृत विषयात ८६% गुण मिळवून विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. या उज्ज्वल यशाबद्दल दैवज्ञ ब्राह्मण समाज, तळे यांच्या वतीने मुंबईचे आद्य शिल्पकार समाजभूषण कै. नामदार नाना शंकरशेट यांच्या १६१ व्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून ३१ जुलै रोजी श्री लक्ष्मीनारायण मंदिरात भव्य सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित समाजबांधवांच्या हस्ते स्वराला “नामदार नाना शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्ती”, सन्मानचिन्ह, गौरवपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. गो. म. वेदक विद्यामंदिर, तळे येथे प्रथमच संस्कृत विषय ऐच्छिक व सक्तीचा करण्यात आला असतानाही, स्वराने संस्कृत विषयाची निवड करून त्यावर लक्ष केंद्रित केले आणि हे ध्येय साध्य करून इतर विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला.
कै. नाना शंकरशेट हे स्वतः संस्कृतप्रेमी असल्याने त्यांच्या नावाने ही शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच अ. भा. दै. स. प. व श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टतर्फे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय मानल्या जाणाऱ्या संस्कृत भाषेचे जतन व्हावे या उदात्त हेतूने हा सन्मान दिला जातो. या वेळी बोलताना अध्यक्ष सुहास वावेकर यांनी स्वराने मिळवलेल्या यशाचे कौतुक केले व तिने भविष्यात संस्कृत विषयात पीएच.डी. (डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी) करावी, अशी इच्छा व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास समाजबांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मित्तल वावेकर यांनी केले.



