मुंबईचे शिल्पकार नामदार नाना शंकरशेट १६१ वा पुण्यस्मरण सोहळा: संस्कृत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व ज्येष्ठांचा सत्कार

तळा ( किशोर पितळे ) श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट व दैवज्ञ ब्राह्मण समाज, तळे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (३१ जुलै २०२६) मुंबईचे शिल्पकार नामदार नाना शंकरशेट यांचा १६१ वा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी नामदार नाना शंकरशेट यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी नानांच्या समाजोपयोगी, शैक्षणिक व संस्कृतप्रेमी कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत त्यांना विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगाचे औचित्य साधून एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत संस्कृत विषयात विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थिनी कु. निर्जला चेतन कीर्तने, कु. स्वरा प्रकाश गायकवाड आणि कु. तेजस्विनी सुशील तिवारी यांना “नामदार नाना शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्ती” प्रदान करून सन्मानचिन्ह, गौरवपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच दैवज्ञ ब्राह्मण समाजातील ज्येष्ठ समाजबांधव श्री. गणेश विष्णू वेदक (गणेशभाऊ) यांच्या ९० व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना निरोगी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात किशोर गणेश वेदक, नंदकुमार द्वारकानाथ वेदक आणि प्रकाश गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून नाना शंकरशेट यांच्या महान कार्याचा परिचय करून दिला. अध्यक्षीय समारोप भाषणात सुहास कमळाकर वावेकर यांनी शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन महिला मंडळाच्या सचिव सौ. मित्तल सुहास वावेकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी शिष्यवृत्तीच्या रोख रकमेचे सौजन्य संजय वसंत वेदक, तर सन्मानचिन्ह व गौरवपत्राचे सौजन्य कमळाकर वावेकर यांचे लाभले. याशिवाय तळे मराठी शाळेत विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटपासाठी पत्रकार किशोर पितळे व पेन वाटपासाठी खजिनदार राजेश वेदक यांचे विशेष सहकार्य मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव हर्षद दिलीप वेदक, खजिनदार राजेश नारायण वेदक व समाजातील सर्व ज्येष्ठ-श्रेष्ठ समाजबांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले.



