ताज्या घडामोडी

संघर्षातून वकिलीपर्यंतची भरारी; पुरारचे ॲड. तुषार बिरवाडकर तरुणांसाठी प्रेरणास्थान

माणगाव (चांदोरे) नंदकुमार चांदोरकर  जिद्द, कठोर परिश्रम आणि शिक्षणावरील निष्ठेच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुरार गावचे सुपुत्र ॲड. तुषार रामदास बिरवाडकर यांनी वकिली क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गरीबीतून सुरू झालेला त्यांचा संघर्षमय प्रवास आज रायगड जिल्ह्यातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. मजुरी, रंगकाम, गवत कापणे अशी विविध कामे करत त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. आर्थिक संकटातही त्यांनी लहान बहिणीचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडली.

मुंबईत आल्यानंतरही कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचणींचा सामना करत त्यांनी विधी शाखेचे शिक्षण पूर्ण केले. बार कौन्सिलची परीक्षा उत्तीर्ण होऊन कायमस्वरूपी वकील म्हणून नोंदणी मिळवत त्यांनी संघर्षाचे यशात रूपांतर केले.

या यशामागे त्यांच्या आजी आणि बहिणीचा मोठा वाटा असून, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी त्यांना प्रेरणा दिली. शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचा विचार त्यांनी आपल्या जीवनात रुजवला.

समाजसेवेची आवड जपत ॲड. बिरवाडकर यांनी अनेक गरजू रुग्णांना मदत केली असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. बालकांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना निःस्वार्थ मदतीचा हात देत ते सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत आहेत.

“परिस्थिती माणसाला हरवत नाही; हार मानण्याची वृत्ती हरवते,” हा संदेश त्यांच्या जीवनप्रवासातून समाजाला मिळत असून, त्यांचा संघर्ष आणि सेवाभाव पुढील पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button