बल्क ड्रग पार्कला तीव्र विरोध; पाणसई येथे ‘बल्क ड्रग पार्क जागृत संघर्ष समिती’ची स्थापना

माणगाव प्रतिनिधी ( नंदकुमार चांदोरकर ) – रोहा-माणगाव परिसरात प्रस्तावित बल्क ड्रग पार्क प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत असून, या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यातील पाणसई येथे शनिवारी (दि. २ ऑगस्ट) ग्रामस्थांची जाहीर बैठक घेऊन ‘बल्क ड्रग पार्क जागृत संघर्ष समिती – पाणसई’ ची स्थापना करण्यात आली. माणगाव तालुक्याचे सभापती विलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
बैठकीत उपस्थित ग्रामस्थांनी हा लढा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून जनतेचे आरोग्य, पर्यावरण संरक्षण आणि भावी पिढीच्या सुरक्षित भवितव्यासाठी असल्याचे स्पष्ट केले. समितीच्या अध्यक्षपदी संजय भगवान कदम, उपाध्यक्षपदी काशीरामभाऊ हर्णेकर व पांडुरंग दगडू तेलंगे, सचिवपदी सयाजी मोरे, उपसचिवपदी बाळाराम वालगुडे, खजिनदारपदी सुधाकर शेडगे आणि उपखजिनदारपदी मधुकर उतेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी नागरिकांनी प्रकल्पामुळे परिसरात रासायनिक उद्योग वाढून हवा, पाणी, शेती आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली. शासनाने या प्रकल्पाचा सखोल अभ्यास करून स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घ्याव्यात, अन्यथा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.
समितीच्या वतीने जनजागृती, ग्रामसभांचे ठराव, निवेदने तसेच कायदेशीर मार्गाने लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. समिती बळकट करण्यासाठी प्रत्येकाने तन-मन-धनाने योगदान देण्याचे आवाहनही करण्यात आले.
नवनिर्वाचित अध्यक्ष संजय कदम यांनी समितीच्या कामकाजासाठी २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. सभापती विलास शिंदे यांनी १० हजार रुपये, खजिनदार सुधाकर शेडगे यांनी १० हजार रुपये, सुदाम थिटे यांनी ५ हजार रुपये तर भारत डिगे यांनी ५ हजार रुपयांची मदत जाहीर करून संघर्ष समितीला आर्थिक पाठबळ दिले. यावेळी कोअर कमिटीसाठी प्रतिनिधी म्हणून शंकर पवार, पत्रकार संतोष मोरे, गणेश सुकूम, लहू लुष्टे पाटील आणि लक्ष्मण धाडवे यांचीही एकमताने निवड करण्यात आली.
आगामी काळात रोहा-माणगाव परिसरातील बाधित गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवून प्रकल्पाचे संभाव्य परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले. तसेच महिला व मुंबईस्थित ग्रामस्थांचाही या आंदोलनात सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कालवण, मुठावली, भिनाड, कारंजेवाडी, देऊळवाडी, सिद्धार्थनगर, मुळगाव व पाणसई परिसरातील ७५ नागरिकांनी स्वेच्छेने संघर्ष समितीचे सभासदत्व स्वीकारले. या बैठकीस परिसरातील ग्रामस्थ, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



