नांदवी विद्यालयाच्या १९९८ च्या दहावी बॅचचा सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

माणगाव / चांदोरे ( नंदकुमार चांदोरकर ) नूतन माध्यमिक नांदवी विद्यालयाच्या सन १९९८ च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वानगाव येथील जिल्हा परिषद शाळा, वनई मेढीपाडा या अतिदुर्गम आदिवासी वस्तीवरील शाळेत गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून उपस्थितांनी माजी विद्यार्थ्यांच्या या कार्याचे मनापासून कौतुक केले आहे.
या सामाजिक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना छत्र्या, पेन, कलर बॉक्स यांसह विविध खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत करून केली. शाळेच्या प्रवेशद्वारापासून सभागृहापर्यंत विद्यार्थ्यांनी केलेले स्वागत आणि त्यानंतर सादर केलेली सरस्वती वंदना व स्वागतगीताने संपूर्ण वातावरण प्रसन्न आणि भावनिक झाले होते. यानंतर सरस्वती पूजन, मान्यवरांचा सत्कार, शाळेची माहिती, शिक्षकांचे मनोगत तसेच पाहुण्यांचे मार्गदर्शनपर विचार संपन्न झाले.
यावेळी १९९८ बॅचचे राजेश नांदविकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर यश संपादन करण्याचा संदेश दिला. विनोद पेलनेकर यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करत आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तसेच प्रशांत जाधव, प्रज्ञा महाडीक, उज्वला सावंत आणि समीक्षा मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवले.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे शिक्षक सुशील सर यांनी आभार प्रदर्शन करून १९९८ च्या बॅचने राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे समाजात शिक्षणाविषयी सकारात्मक संदेश जात असून गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



