ताज्या घडामोडी

बाप्पाच्या आगमनाला खड्ड्यांचे ग्रहण! ‘नांदवी तर्फे टोळ’ रस्त्याची भीषण चाळण; चाकरमान्यांचे हाल.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त; गणेशोत्सवापूर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

रोहिदास नगर / गोरेगाव (प्रसाद गोरेगांवकर) कोकणच्या पावन भूमीत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सर्वात मोठ्या ‘श्री गणेशोत्सवाची’ लगबग आणि उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्याहून लाखो चाकरमानी बाप्पाच्या आगमनासाठी गावी येण्यास सज्ज झाले आहेत. मात्र, दुसरीकडे ‘नांदवी तर्फे टोळ’ जाणाऱ्या मुख्य रस्त्याची झालेली अत्यंत भीषण आणि दयनीय दुरवस्था स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे ‘थेट अपघाताला आवताण’ देण्यासारखेच झाले आहे.


नांदवी ते टोळ या संपूर्ण मार्गावर सध्या “रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता शोधायचा?” अशी बिकट आणि संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील डांबर उडून खडी उघडी पडली आहे, तर खड्ड्यांमध्ये पाण्याचे विशाल तळे साचले आहे.  खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी घसरून पडणे, वाहनांचे एक्सल तुटणे आणि छोटे-मोठे अपघात घडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या खडतर मार्गावरून कसरत करत वाहन चालवताना वाहनधारकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या हजारो चाकरमान्यांसह स्थानिक ग्रामस्थांसमोर आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे — “या खड्डेमय रस्त्यावरून श्रींच्या मूर्तीचे सुरक्षित आगमन कसे करायचे?” रस्त्याची अवस्था पाहता मूर्तीला धक्का बसण्याची आणि दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ कागदी खेळ खेळत असल्याचा आरोप करत, “आम्हाला तात्पुरती मलमपट्टी नको, तर गणेशोत्सवाआधी ठोस डांबरीकरण किंवा दणकट दुरुस्तीच हवी!” असा सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने गाढ झोपेतून जागे व्हावे आणि श्रींच्या आगमनापूर्वी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी आक्रमक मागणी टोळ, भांडीवली व परिसरातील नागरिकांनी केली आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्ता सुस्थितीत न झाल्यास चाकरमानी, स्थानिक नागरिक आणि प्रवासी रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडतील, असा रोखठोक इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

ग्रामस्थांचा संतप्त सवाल:

“दरवर्षी कराच्या रूपाने लाखो रुपये उकळणारे प्रशासन रस्त दुरुस्तीसाठी बाप्पाच्या आगमनाची वाट पाहणार का? गणेशोत्सवापूर्वी जर रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही, तर होणाऱ्या अपघातांना आणि नागरिकांच्या रोषाला पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार असेल!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button