इंदापूर वनविभागाची मोठी कारवाई: खैराच्या सोलीव लाकडासह चौघे ताब्यात; ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

रोहिदास नगर / गोरेगांव (प्रसाद गोरेगांवकर) माणगाव तालुक्यातील इंदापूर परिमंडळातील वनविभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत खैराच्या सोलीव लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या चार जणांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या कारवाईत खैराचे सोलीव लाकूड आणि दोन मोटारसायकली असा एकूण ८४ हजार २८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे कशेणे येथील राखीव वन क्रमांक ३०६ परिसरात खैराच्या लाकडाची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त बातमी वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार माणगावचे वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुजित राजमाने (इंदापूर), वनरक्षक अमिना मणेर (कुशेडे), अशोक कोहकडे (इंदापूर), निलेश नाईकवाडे (माकटी) आणि वैशाली भोर (रातवड) यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला.
दरम्यान, दोन मोटारसायकलींवर गोणीत भरून खैराच्या सोलीव तुकड्यांची वाहतूक करताना चार संशयित दिसून आले. वन कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून मुगवली येथील कालव्याजवळ त्यांना गनिमी काव्याने पकडले.
जप्त केलेला मुद्देमाल
-
खैराचे सोलीव तुकडे: २८४ घनडेसी मीटर (१.७५९ घनमीटर) – अंदाजे किंमत ₹२४,२८६
-
वाहने: दोन मोटारसायकली (MH 06 CR 5485 व MH 06 BZ 4507) – अंदाजे किंमत ₹६०,०००
-
एकूण मुद्देमाल: ₹८४,२८६/-
ताब्यात घेतलेले आरोपी
१. नितीन रविंद्र वाघमारे (वय १८), २. रोशन संतोष जाधव (वय २०)
३. सहदेव तुकाराम जाधव (वय ३०), ४. महेश संतोष जाधव (वय २३)
(सर्व रा. नगरोली, ता. माणगाव)
सदर प्रकरणी भारतीय वन अधिनियम, १९२७ मधील कलम २६(१)(फ), ४१(२) व ४२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे (रो.गु. क्र. सी-०५/२०२६). आरोपींना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, माणगाव यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २७ जुलै २०२६ पर्यंत वन कोठडी सुनावली होती. या प्रकरणाचा पुढील तपास वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरचे वनपाल सुजित राजमाने करत आहेत.



