ताज्या घडामोडी

पर्यावरणपूरक उपक्रम!

म्हसळ्यातील सुवर्ण व्यावसायिक गौरव पोतदार यांच्याकडून २५ झाडांचे वृक्षारोपण; समाजापुढे ठेवला आदर्श

 

तळा ( किशोर पितळे ): “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…” या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वचनाचा व विचारांचा वारसा जपत, म्हसळ्यातील सोने-चांदी व्यापारी गौरव पोतदार आणि त्यांचे सहकारी मित्र राजेश करडे यांनी सामाजिक बांधिलकीतून एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. म्हसळा बायपास रस्त्यालगत तब्बल २५ झाडे लावून केवळ वृक्षारोपणच केले नाही, तर या झाडांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या संवर्धनाचा अनोखा संकल्प केला आहे. त्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यातून भरभरून कौतुक होत आहे.

बायपास रस्त्याला मिळणार हिरवाईची सावली

म्हसळा बायपास रस्ता अंदाजे ५ ते ६ किलोमीटर लांबीचा आहे. मात्र, या संपूर्ण रस्त्यावर सध्या एकही मोठे झाड नसल्याने उन्हाळ्यात जमिनीतील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते. या समस्येवर मात करण्यासाठी गौरव पोतदार व राजेश करडे यांनी या भागात वृक्षारोपण केले आहे. या झाडांमुळे भविष्यात जमिनीची धूप थांबण्यास मदत होईल, जमिनीतील ओलावा टिकून राहील आणि परिसरात ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना, प्रवाशांना तसेच पशु-पक्षांना हक्काची सावली व आधार मिळणार आहे.

प्रदूषणावर मात आणि प्राणवायूची निर्मिती

सध्या वाढत्या प्रदूषणामुळे आणि पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. या वृक्षारोपण उपक्रमामुळे परिसरातील हवेचे प्रदूषण कमी होऊन शुद्ध ऑक्सिजन (प्राणवायू) मिळण्यास मदत होईल. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना क्षणभर विसावा घेऊन शुद्ध हवेचा आनंद घेता यावा, या उद्देशाने या झाडांचे संगोपन अतिशय जबाबदारीने केले जाणार आहे.

युवा पिढीसाठी प्रेरणादायी संदेश

गौरव पोतदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबवलेल्या या ध्येयवेड्या उपक्रमातून आजच्या युवा पिढीला सामाजिक कार्याची मोठी प्रेरणा मिळाली आहे. केवळ वृक्षारोपण करून न थांबता, त्या झाडांचे संगोपन करणे किती गरजेचे आहे, याचा एक उत्तम आदर्श त्यांनी समाजासमोर घालून दिला आहे.

या अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रमाबद्दल म्हसळा तालुक्यातून गौरव पोतदार आणि राजेश करडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, इतर नागरिकांनीही यातून प्रेरणा घेऊन वृक्षारोपणासाठी पुढे यावे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button