ताज्या घडामोडी

सततच्या वीज खंडिततेमुळे मोर्बा ग्रामस्थ आक्रमक

MSEB कार्यालयावर धडक मोर्चा, अतिरिक्त फिडरलाईन आणि स्टाफची मागणी!

रोहिदास नगर/गोरेगांव ( प्रसाद गोरेगांवकर ) गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि सातत्यपूर्ण पावसामुळे मोर्बा गावात वारंवार वीज खंडित (लाईट जाणे) होत आहे. या समस्येला कंटाळून आणि संतप्त होऊन आज मोर्बा ग्रामस्थांनी थेट स्थानिक महावितरण (MSEB) कार्यालयावर धडक मोर्चा नेला. ग्रामस्थांनी कार्यालयात उपस्थित अधिकाऱ्यांना या त्रासाबाबत जाब विचारत तीव्र संताप व्यक्त केला.

उघड्या डी.पी.मुळे अपघाताची भीती: अरिफ मनेर यांचा सवाल

या आंदोलनादरम्यान ‘उबाठा’ गटाचे अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष अरिफ मनेर यांनी महावितरणच्या कारभारावर जोरदार प्रहार केला. “गावात अनेक ठिकाणी डी.पी. (DP) उघड्या अवस्थेत पडलेल्या आहेत. त्यातच जवळच मच्छी मार्केट असल्याने तिथे नागरिकांची सतत वर्दळ असते. अशा गजबजलेल्या ठिकाणी उघड्या डी.पी.मुळे चुकून एखादा मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार?” असा संतप्त सवाल अरिफ मनेर यांनी यावेळी उपस्थित केला. पावसाळ्यात उघड्या तारांमुळे जीवितहानी होण्याचा धोका असल्याने ग्रामस्थांनी याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली.

अतिरिक्त फिडरलाईन आणि वाढीव स्टाफची मागणी

मोर्बा गावाची वीज समस्या कायमस्वरूपी सुटावी यासाठी ग्रामस्थांनी महावितरणकडे ‘अतिरिक्त फिडरलाईन’ देण्याची आग्रही मागणी केली. तसेच, येथील कार्यालयात तातडीने अतिरिक्त कर्मचारी (स्टाफ) वाढवण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली.

“काल रात्री सोसाट्याचा वारा सुटल्याने गावाची लाईट गेली होती. जर कार्यालयात पुरेसा स्टाफ उपलब्ध असता, तर तातडीने दुरुस्ती होऊन ग्रामस्थांवर रात्रभर अंधारात राहण्याची वेळ आली नसती,” अशा शब्दांत आंदोलक ग्रामस्थांनी आपली व्यथा आणि संताप मांडला.

अधिकाऱ्यांची ग्वाही

ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा आणि रास्त मागण्या ऐकल्यानंतर, मोर्बा MSEB कार्यालयातील उपस्थित अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेतली. “सध्या सतत पडत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून वीज पुरवठा खंडित होत आहे,” असे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी यावेळी दिले. तसेच मोर्बा गावाची अतिरिक्त फिडरलाईन, वाढीव स्टाफ आणि उघड्या डी.पी.ची दुरुस्ती याबाबतची ग्रामस्थांची मागणी अत्यंत महत्त्वाची असून, या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती आणि अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तात्काळ पाठवला जाईल, अशी ग्वाही उपस्थित अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांना दिली.

वरिष्ठ पातळीवरून यावर काय निर्णय होतो आणि मोर्बा गावाला या त्रासातून तसेच संभाव्य धोक्यातून कधी मुक्ती मिळते, याकडे आता संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button