‘मंत्रालयातील बडा अधिकारी’ सांगणाऱ्या डॉ. विजय गायकवाड यांचा मालडुंगेत बेधडक ‘गोरखधंदा’
नियम धाब्यावर ठेवून निसर्गाची लूट, ग्रामपंचायतीची पुन्हा नोटीस!

पनवेल ( गणपत वारगडा ) ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगे हद्दीत कायद्याची उघडपणे पायमल्ली करत बेकायदेशीर बांधकाम आणि विनापरवाना माती उत्खनन (खोदकाम) केल्याप्रकरणी मुंबईतील तथाकथित बडे प्रस्थ डॉ. विजय गायकवाड यांच्याविरोधात ग्रामपंचायतीने आक्रमक पाऊल उचलले आहे. मालडुंगे ग्रामपंचायतीने त्यांना पुन्हा एकदा कडक नोटीस बजावली असून, त्यांच्या या बेकायदेशीर कृत्याविरोधात सिडको ‘नैना’ प्राधिकरण विभाग, पनवेलचे तहसीलदार, वनविभाग, गटविकास अधिकारी (BDO) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांना थेट लेखी पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे.
🚫 ‘नैना’ आणि ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी नाही!
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथे राहणाऱ्या डॉ. विजय गायकवाड यांनी मालडुंगे हद्दीतील प्रसिद्ध देहरंग धरणालगत जमीन खरेदी केली आहे. या ठिकाणी स्वतःचे फार्म हाऊस बनवताना त्यांनी सर्व कायदे धाब्यावर बसवले आहेत मालडुंगे ग्रामपंचायतीची कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नाही. सिडकोच्या ‘नैना’ (NAINA) प्राधिकरणाची कोणतीही मंजुरी न घेता दगडी कंपाउंड, बेकायदेशीर माती उत्खनन आणि अनधिकृत बांधकाम केले आहे. यापूर्वी सरपंच श्री. सिताराम चौधरी आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री. विनोद मोरे यांनी अधिकृत नोटीस देऊन ७ दिवसांत हे बांधकाम हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्या नोटिसीला केराची टोपली दाखवण्यात आली.
💼 “मी मंत्रालयात मोठा अधिकारी होतो…” कारवाई टाळण्यासाठी पदाचा गैरवापर!
धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासकीय कारवाईला भीक न घालता डॉ. गायकवाड यांनी उलट अधिक जोमाने बेकायदेशीर काम सुरू ठेवले आहे. “मी मंत्रालयात शासकीय सेवेत मोठा अधिकारी होतो आणि आता राजकीय पक्षाच्या मोठ्या पदावर आहे,” अशी दमदाटी व थापा मारून ते स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. मात्र, त्यांच्या या दबावाला बळी न पडता सरपंच सिताराम चौधरी आणि ग्रामपंचायत अधिकारी विनोद मोरे यांनी पुन्हा एकदा त्यांना अनधिकृत बांधकामाबाबत नवीन नोटीस (दि. ०२/०७/२०२६ रोजी) बजावून प्रशासकीय दणका दिला आहे.
🏍️ नवीन पनवेल-माथेरान मुख्य रस्त्यावर अपघातांचे सत्र; सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त!
डॉ. गायकवाड यांच्या या अरेरावीचा फटका आता सर्वसामान्य वाहनचालकांना आणि स्थानिक ग्रामस्थांना बसत आहे. त्यांनी नवीन पनवेल-माथेरान मुख्य रस्त्यावरील एका अत्यंत अपघाती आणि धोकादायक वळणावर स्वतःसाठी बेकायदेशीर रस्ता बनवला असून, तिथले नैसर्गिक गटारच नष्ट केले आहे. या बेकायदेशीर खोदकामामुळे पावसाच्या पाण्यासोबत डांबरी रस्त्यावर पूर्ण माती वाहून आली आहे. या चिखलामुळे आणि मातीमुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडत असून सातत्याने अपघात होत आहेत. इतके होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) हात बांधून का बसला आहे? ते एखाद्या मोठ्या जीवघेण्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
🚨 थेट सवाल: या विभागांची फसवणूक झाली, कारवाई कधी?
-
नैना प्राधिकरण: पूर्वपरवानगी न घेता बांधकाम करून सिडको नैना विभागाची उघड फसवणूक केली, तरीही कारवाई शून्य का?
-
तहसीलदार व महसूल खाते: बेकायदेशीर माती उत्खनन करून महसूल विभागाला मारेल फाट्यावर मारले जात आहे, तरीही अधिकारी गप्प का?
-
वनविभाग: धरण परिसराजवळ बेकायदेशीर वृक्षतोड करूनही वनविभागाचा वचक का दिसत नाही?
एकीकडे मंत्रालयाचे नाव सांगून विविध शासकीय विभागांची दिशाभूल करायची आणि दुसरीकडे निसर्गाचा आणि मानवी जिवाचा खेळ मांडायचा, हा प्रकार आता पनवेलमध्ये सहन केला जाणार नाही, अशी भूमिका मालडुंगेकरांनी घेतली आहे. आता यावर संबंधित उच्चपदस्थ प्रशासन काय कारवाई करते, की या ‘बड्या’ राजकीय पदाधिकाऱ्याच्या दबावापुढे नांगी टाकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



