ताज्या घडामोडी

गोरेगाव-आंबेत मार्ग बंद; नांदवीत पूर, कुंभारवाडीत शिरले पाणी! ग्रामसेवक, तलाठी गायब; विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

'वत्सल' नदीने धोक्याची पातळी ओलांडली; गावात यंत्रणाच पोहोचली नसल्याने ग्रामस्थ संतापले; "आम्हाला काही झाल्यास जबाबदार कोण?"

रोहिदास नगर /गोरेगाव ( प्रसाद गोरेगांवकर ) एकीकडे सापे बंदरातील बार्जेस धडकल्याने आंबेत पुलावरील वाहतूक ठप्प झालेली असतानाच, आता गोरेगाव-आंबेत मार्गावरील प्रवाशांची कोंडी करणारी आणि काळजात धडकी भरवणारी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे नांदवी येथील वत्सल नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. नदीचे हे पूरसदृश पाणी थेट मुख्य रस्त्यावर आल्यामुळे गोरेगाव-आंबेत मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याने संपूर्ण परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून जवळच असलेल्या कुंभारवाडीत पुराचे पाणी घुसल्याने स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.

      

🚫 डोळ्यांत धडकी भरवणारे वास्तव; विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास!

रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे आज सकाळी शाळेत गेलेले निष्पाप विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. प्रशासनाची कोणतीही मदत न मिळाल्याने अखेर स्थानिक ग्रामस्थांनी स्वतःचा जीव मुठीत धरून या विद्यार्थ्यांना पाण्याच्या वेगवान प्रवाहातून सुखरूप बाहेर काढले. मात्र, हा जीवघेणा प्रवास करताना एखादा पाय घसरला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. लहान मुले आणि महिला एकमेकांचा हात धरून या पुरातून वाट काढत आहेत, पण जबाबदार यंत्रणा मात्र ढिम्म आहे.

💼 आपत्ती व्यवस्थापनाचे वाजले बारा; ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल जागेवरून गायब!

या गंभीर परिस्थितीमध्ये स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अद्याप एकही प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी पोहोचलेला नाही. ग्रामसेवक, तलाठी की कोतवाल… यांपैकी कोणीही कुंभारवाडीत फिरकलेले नाही. “गाव पाण्याखाली जात असताना आणि घरात पाणी घुसलेलं असताना प्रशासकीय यंत्रणा नेमकी कुठे झोपा काढत आहे? जर कुंभारवाडीतील आम्हां ग्रामस्थांना किंवा लहान मुलांना काही झाले, तर याला जबाबदार कोण?” असा संतप्त आणि जळजळीत सवाल आता स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.


🚨 …तर प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतंय का?

संपूर्ण रायगड जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला असताना, गोरेगावमधील नांदवी आणि कुंभारवाडी परिसराची झालेली ही दुरवस्था प्रशासनाचे पुरते धिंडवडे काढणारी आहे. “उद्या जर या वेगवान पाण्याच्या प्रवाहात एखादा शालेय विद्यार्थी किंवा कुटुंब वाहून गेलं, तर त्याचे पाप कोणाच्या पदरात पडणार? केवळ कागदावर आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेणारे अधिकारी कुंभारवाडीत येऊन प्रत्यक्ष मदत कधी सुरू करणार?” असा रोखठोक सवाल ‘रायगड प्रतिबिंब न्युज’च्या माध्यमातून विचारला जात आहे. प्रशासनाने तात्काळ कुंभारवाडीत धाव घेऊन ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवावे आणि मदतकार्य सुरू करावे, हीच आता एकमेव मागणी आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button