देवकुंड धबधबा दुर्घटना: दोन निष्पाप तरुणांचा करुण अंत; प्रशासकीय बंदी केवळ कागदावर!
तहसीलदारांचा दावा फोल; 'रायगड प्रतिबिंब'चा इशारा हवेत मिळवून महसूल आणि पोलीस प्रशासनाने घेतला पर्यटकांचा बळी?

रोहिदास नगर / गोरेगाव ( प्रसाद गोरेगांवकर ) माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध आणि तितकाच धोकादायक ठरत असलेला ‘देवकुंड धबधबा’ परिसरात आज एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या भागात जाहीर केलेली प्रवेशबंदी केवळ कागदोपत्रीच ठरल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, चाकण (पुणे) येथून पर्यटनासाठी आलेल्या २१ युवकांच्या ग्रुपमधील दोन तरुणांचा धबधब्याखालील कुंडात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेत आता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली असून, प्रशासकीय आदेश डावलून पर्यटकांना धोकादायक क्षेत्रात प्रवेश करू दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
🚨 दुपारी १:५७ वाजता घडली दुर्घटना; नेटवर्कअभावी मदतीला उशीर
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील चाकण येथून २१ तरुणांचा एक ग्रुप देवकुंड परिसरात पर्यटनासाठी आला होता. दुपारी साधारण १ वाजून ५७ मिनिटांच्या सुमारास या ग्रुपमधील गोपाळ रामराव राठोड (वय २४ वर्षे) आणि विष्णु ढोक (वय २३ वर्षे) हे दोघे धबधब्याखालील खोल कुंडात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात बुडू लागले.
दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आणि सहकाऱ्यांनी तातडीने प्रशासनाला किंवा मदत यंत्रणेला माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु, देवकुंड परिसरात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे ही माहिती वेळेवर बाहेर पोहोचू शकली नाही. परिणामी, मदत आणि बचाव यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यास प्रचंड उशीर झाला आणि दोन्ही तरुणांना आपले प्राण गमवावे लागेले.
⛔ बंदी असतानाही प्रवेश; एजंट घटनास्थळावरून पसार?
या घटनेतील सर्वात महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे, कडक प्रशासकीय बंदी असतानाही या २१ जणांच्या ग्रुपला एका स्थानिक एजंटने नियमांचे उल्लंघन करून आत सोडले होते. सुरक्षिततेची कोणतीही हमी नसताना पर्यटकांना थेट खोल कुंडात उतरू दिले गेले. विशेष म्हणजे, दुर्घटना घडताच पर्यटकांना वाऱ्यावर सोडून हा एजंट घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरून स्थानिक पातळीवर पर्यटकांच्या जीवाशी कसा खेळ मांडला जातोय, हे स्पष्ट झाले असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
⚠️ कलम १६३ चा फज्जा; ‘रायगड प्रतिबिंब’चा इशारा हवेत मिळवला, तहसीलदारांचा दावा फोल!
माणगावचे प्रांताधिकारी संदिपान सानप यांनी ताम्हिणी घाट, सिक्रेट पॉइंट आणि देवकुंड परिसरात पावसाळ्यातील जीवितहानी टाळण्यासाठी कलम १६३ अंतर्गत कडक प्रवेशबंदी लागू केली होती. मात्र, या बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याकडे ‘रायगड प्रतिबिंब न्यूज’ने सातत्याने बातम्या प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अगदी ५ आणि ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीदरम्यानही स्थानिक स्तरावर नियमांची सर्रास पायमल्ली करून पर्यटकांना जीवघेण्या प्रवासासाठी आत सोडत असल्याचे व्हिडिओ पुरावे आम्ही समोर आणले होते.
इतकेच नाही तर, काल सकाळीच माणगावच्या तहसीलदारांना व्हॉट्सॲप (WhatsApp) वर थेट मेसेज पाठवून, ‘येत्या काळात देवकुंड परिसरात मोठी दुर्घटना किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो, त्यामुळे तातडीने दक्षता घ्यावी,’ अशी स्पष्ट पूर्वकल्पना आणि इशाराही दिला होता.

विशेष म्हणजे, यावर माननीय तहसीलदारांनी आज सकाळीच ‘रायगड प्रतिबिंब’ला रिप्लाय दिला होता. त्यात त्यांनी म्हटले की, “देवकुंड परिसरात कलम १६३ लागू असून आज तिथे सानप नावाचे पोलीस अंमलदार ऑन-ड्यूटी आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता देवकुंड पूर्णपणे बंद असून आलेल्या पर्यटकांना परत पाठवण्यात आले आहे.”
तहसीलदारांचा हा रिप्लाय आणि ऑन-ड्यूटी पोलिसांचा हा दावा किती खोटा आणि दिशाभूल करणारा होता, हे आज दुपारी २१ पर्यटकांचा ग्रुप थेट धबधब्यापर्यंत पोहोचल्याने आणि त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाल्याने सिद्ध झाले आहे. जर पर्यटन क्षेत्र पूर्णपणे बंद होते आणि पोलीस बंदोबस्त तैनात होता, तर मग हा २१ जणांचा ग्रुप थेट मृत्यूच्या कुंडात पोहोचलाच कसा? पोलिसांच्या या ‘ऑल इज वेल’च्या खोट्या अहवालावर तहसीलदारांनी कसा विश्वास ठेवला?
प्रशासनाच्या याच ढिसाळ कारभारामुळे, खोट्या दाव्यांमुळे आणि गांभीर्य नसल्यामुळे अखेर आज ही दुर्दैवी घटना घडली असून दोन निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हलगर्जीपणाला आणि खोट्या माहितीला आता जबाबदार कोण? ऑन-ड्यूटी पोलिसांवर आणि दिशाभूल करणाऱ्या यंत्रणेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
❓ ‘रायगड प्रतिबिंब न्यूज’चे प्रशासनाला थेट प्रश्न:
-
त्या बेजबाबदार एजंटला अटक कधी होणार? पर्यटकांना प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या त्या एजंटवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक होणार का?
-
ऑन-ड्यूटी पोलिसांवर निलंबनाची कारवाई होणार का? प्रवेशबंदीच्या ठिकाणी तैनात असलेले पोलीस कर्मचारी आणि महसूल अधिकारी नेमकी कोणती ड्युटी बजावत होते? कर्तव्यात कसूर करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे निलंबन होणार का?
-
बंदी असताना २१ पर्यटक आत पोहोचलेच कसे? प्रशासकीय आदेश धुडकावून एवढा मोठा ग्रुप धबधब्यापर्यंत पोहोचतोच कसा?



