ताज्या घडामोडी

देवकुंड धबधबा दुर्घटना: पोलिसांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह; बंदी असतानाही ‘शेकडो’ पर्यटक पोहोचले कसे?

गोरेगांव/रोहिदास नगर (प्रसाद गोरेगांवकर) १२ जुलै २०२६ रोजी देवकुंड धबधब्याच्या धोकादायक कुंडात बुडून दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणातून आपली बाजू सावरत, “आम्ही पर्यटकांना मुख्य प्रवेशद्वारावरून सोडले नव्हते, ते चोर वाटेने किंवा आडवाटेने स्थानिक एजंटच्या मदतीने आत गेले होते,” असा दावा केला आहे.  परंतु, पोलिसांच्या या दाव्यामधील फोलपणा आता समोर येत असून प्रत्यक्षदर्शींच्या माहितीमुळे प्रशासकीय यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

बंदी असताना शेकडो पर्यटक आले कुठून?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जणांच्या या ग्रुपला धबधब्यावर बंदी असल्यामुळे प्रवेशद्वारावरूनच परत पाठवण्यात आले होते. जर पोलिसांनी या ग्रुपला थांबवले होते, तर मग दुर्घटना घडली त्या वेळी देवकुंड परिसरात आधीपासूनच शेकडो पर्यटक कसे उपस्थित होते? हा सर्वात मोठा आणि अनुत्तरित प्रश्न आहे.

दुर्घटनाग्रस्त ग्रुपमधीलच एका पर्यटकाने दिलेल्या माहितीनुसार, ते जेव्हा आडवाटेने का होईना देवकुंड परिसरात पोहोचले, तेव्हा तिथे केवळ ते २१ जणच नव्हते. त्या ठिकाणी आधीपासूनच अनेक पर्यटकांची तुडुंब गर्दी झाली होती. इतकेच नव्हे तर बंदी असलेल्या आणि अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या त्या मुख्य कुंडामध्ये अनेक जण बिनधास्तपणे पोहण्याचा आनंद घेत होते.

जर प्रशासनाने संपूर्ण परिसरात पर्यटनास बंदी घातली आहे आणि पोलीस बंदोबस्त तैनात आहे, तर शेकडो पर्यटक एकाच वेळी आत कसे काय पोहोचू शकतात? स्थानिक एजंट पैशांच्या मोबदल्यात पर्यटकांना चोर वाटेने आत घेऊन जात असल्याचे उघड झाले आहे. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने लोक आत जात असताना स्थानिक सुरक्षा यंत्रणा, वन विभाग आणि पोलिसांना याची पुसटशीही कल्पना नसावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दोन तरुणांचा नाहक बळी गेल्यानंतर पाटणूस ग्रामपंचायत आणि प्रशासनाला जाग आली आणि घाईघाईने बंदीचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. परंतु, “शेकडो पर्यटक आत कसे गेले?” या मूळ प्रश्नाचे उत्तर देण्यास मात्र पोलीस आणि प्रशासन टाळाटाळ करत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीरपणे पर्यटकांना आत सोडणाऱ्या एजंट्सवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button