ताज्या घडामोडी

देवकुंड धबधबा दुर्घटनेतील धक्कादायक बातमी समोर! मृत तरुणाने एजंटला केले होते ‘ऑनलाईन पेमेंट’; आरोपी एजंटला पोलीस कधी ताब्यात घेणार?

रोहिदास नगर/गोरेगाव (प्रसाद गोरेगांवकर) बंदी आदेश झुगारून पर्यटकांना चोरट्या मार्गाने देवकुंड धबधब्यावर नेणाऱ्या अनधिकृत एजंट्स आणि ट्रेक ऑर्गनायझर्सचे धक्कादायक कारनामे आता उघडकीस येत आहेत. देवकुंड धबधब्यात बुडून मृत्यू झालेल्या पुणे जिल्ह्यातील चाकण येथील दोन तरुणांपैकी एकाने धबधब्याकडे जाण्यासाठी संबंधित एजंटला गुगल पे (Google Pay) / फोन पे (PhonePe) द्वारे ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नव्या खुलाशामुळे पर्यटन बंदी असतानाही पर्यटकांच्या जीवाशी खेळणारे हे एजंट्स पोलिसांच्या रडारवर आले असून, अशा नराधम एजंटला पोलीस कधी अटक करणार?” असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक आणि मृतांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.

मृतासोबत आलेल्या सहकाऱ्याने केला खुलासा

काही दिवसांपूर्वी देवकुंड धबधब्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात पोहण्यासाठी उतरलेल्या गोपाळ रामलाल राठोड आणि विष्णू विलास ढोक या दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतून वाचलेल्या आणि मृत तरुणांसोबत आलेल्या एका सहकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आम्हाला देवकुंड धबधबा बंद असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे आम्ही माघारी (रिटर्न) फिरलो होतो. मात्र, परत जात असताना एका स्थानिक मुलाने (एजंटने) आम्हाला रस्त्यात थांबवले. ‘मी तुम्हाला देवकुंड दाखवतो, पण मला पैसे द्यावे लागतील’ असे सांगून त्याने आम्हाला धबधब्याकडे जाण्याची वाट दाखवली. या एजंटने आमच्याकडून ऑनलाईन पद्धतीने पैसे घेतले, मात्र दुर्दैव असे की, ही रक्कम ज्याने त्याला ट्रान्स्फर केली, तोच मित्र आज आमच्यात नाही.”

गुगल पे /फोन पे व्यवहारांचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागणार ?

पावसाळ्यात रायगड जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ताम्हिणी घाट, कुंभे आणि देवकुंड धबधबा परिसरात पर्यटनावर कलम १६३ (पूर्वीचे कलम १४४) अंतर्गत पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही केवळ पैशांच्या हव्यासापोटी या एजंटने पर्यटकांच्या जिवाशी खेळ केला. मृत तरुणाने ऑनलाईन ट्रान्स्फर केलेल्या पैशांचे डिटेल्स आणि युपीआय आयडी (UPI ID) च्या आधारे पोलीस आता संबंधित बँक खातेदाराचा आणि मुख्य एजंटचा शोध घेतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.

२५ जणांवर गुन्हे, पण मुख्य सूत्रधार कधी जेरबंद होणार?

या दुर्घटनेनंतर माणगाव पोलिसांनी कडक पावले उचलत बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आणि बेकायदेशीरपणे गाईड म्हणून काम करणाऱ्यांसह पर्यटकांच्या सुमारे २५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, ज्याने या निष्पाप तरुणांना पैशांच्या हव्यासापोटी मृत्यूच्या खाईत ढकलले, तो मुख्य सूत्रधार अद्याप मोकळाच फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. पोलिसांनी तात्काळ मृत तरुणाच्या मोबाईलमधील बँक ट्रान्झॅक्शनचा तपास करून मुख्य आरोपीला ताब्यात घ्यावे, अशी मागणी होत आहे.

जनतेतून उमटतेय तीव्र प्रतिक्रिया

“केवळ स्वतःच्या कमिशनसाठी आणि पर्यटकांकडून हजारो रुपये उकळण्यासाठी बंदी असलेल्या धोकादायक ठिकाणी तरुणांना पाठवले गेले. हा केवळ अपघात नसून एजंटने पैशांच्या हव्यासापोटी केलेला घातपातच आहे. त्यामुळे पोलिसांनी केवळ स्थानिक गाईड्सवर कारवाई न करता, ऑनलाईन डिजिटल व्यवहार करणाऱ्या मुख्य एजंटला तात्काळ बेड्या ठोकून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,” अशी आक्रमक मागणी रायगड आणि पुणे परिसरातून जोर धरू लागली आहे. याप्रकरणी माणगाव पोलीस डिजिटल पेमेंटच्या तांत्रिक तपासावरून मुख्य एजंटच्या मुसक्या कधी आवळतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button