ताज्या घडामोडी

देवकुंड धबधब्यावरील दुर्घटना

प्रांताधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एजंट, गाईड आणि पर्यटकांसह 'BNS कलम २२३ (३)(५)' अन्वये २५ जणांवर गुन्हा दाखल!

रोहिदास नगर / गोरेगांव (प्रसाद गोरेगांवकर)  प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या देवकुंड धबधबा परिसरात प्रशासनाने लागू केलेले प्रतिबंधात्मक आदेश झुगारून बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या पर्यटकांसह, पैशांच्या मोहापोटी त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या ट्रॅव्हल एजंट आणि आयोजकांवर पोलिसांनी कायद्याचा मोठा बडगा उगारला आहे. याप्रकरणी एकूण २५ आरोपींवर  भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ आणि उपकलम ३(५) अन्वये कडक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मात्र अद्याप या आरोपींची नांवे समोर आलेली नसून तपासाअंती यांची नांवे समोर येण्याची शक्य़ता आहे

पावसाळ्यात होणारे संभाव्य अपघात आणि पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रशासनाने देवकुंड धबधबा परिसरात पर्यटनासाठी पूर्णपणे  बंदी (प्रतिबंधात्मक आदेश )  असतानाही, पोलिसांची नजर चुकवून काही चोर वाटांनी पर्यटकांना आत नेण्यात आले होते. या बेजबाबदारपणामुळे दोन पर्यटकांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.

बेकायदेशीर आयोजकांचे धाबे दणाणले

प्रशासनाने घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे नियमबाह्य ट्रेक्स आयोजित करणारे एजंट्स, व्यावसायिक संस्था आणि स्थानिक गाईड्सचे धाबे दणाणले आहेत. केवळ पर्यटकच नाही, तर त्यांना अशा प्रतिबंधित क्षेत्रांकडे प्रवृत्त करणारे व्यावसायिक आयोजक या दुर्घटनेला थेट जबाबदार असल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

ऑनलाईन बुकिंग घेणाऱ्या एजंट्सवर पोलिसांची नजर; माणगाव पोलिसांचा कडक इशारा

या संपूर्ण कारवाईनंतर माणगाव पोलिसांनी बेकायदेशीर ट्रेक आयोजित करणारे एजंट्स, संस्था आणि स्थानिक गाईड्सना पोलिसांनी कडक शब्दांत ताकीद देत आवाहन केले आहे की”पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये जाण्याचे धाडस करू नका. तुमचा एक निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. आता अशा कृत्यांवर थेट फौजदारी व कडक कलमांतर्गत (BNS २२३ (३)(५)) सामूहिक कारवाई केली जात असून कुणाचीही गय केली जाणार नाही तसेच कोणत्याही एजंट किंवा गाईडने पर्यटकांना अशा धोकादायक आणि प्रतिबंधित ठिकाणी घेऊन जाऊ नये,  ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल किंवा प्रशासकीय अडचणी येतील. विशेषतः देवकुंड धबधबा परिसरासाठी कोणत्याही प्रकारची ऑनलाईन बुकिंग घेऊ नका. अशा प्रकारे छुप्या पद्धतीने ऑनलाईन बुकिंग घेऊन पर्यटकांची दिशाभूल करणाऱ्यांवर माणगाव पोलिसांची करडी नजर असणार आहे. जर कोणी पोलिसांचा हा इशारा डावलून ऑनलाईन बुकिंग घेताना किंवा पर्यटकांना प्रतिबंधित क्षेत्रात नेताना आढळल्यास, त्यांच्यावर थेट BNS कलम २२३ (३)(५) आणि महाराष्ट्र पर्यटन कायद्यान्वये संघटित गुन्ह्यांतर्गत तात्काळ अटक व कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत असून, या बेकायदेशीर ट्रेकचे आयोजन करणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा आणि एजंट्सचा शोध वेगाने घेतला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button