ताज्या घडामोडी

‘आभार मानू नका, भार वाढतो…’ रोहन साळवींच्या ‘त्या’ विधानाने जिंकली उपस्थितांची मने

उसरघर वाडी शाळेत शैक्षणिक साहित्य आणि स्नेहभोजनाचे वाटप!

रोहिदास नगर / गोरेगांव ( प्रसाद गोरेगांवकर ) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाचा हात ठेवत, बहुजन वंचित आघाडीचे माणगाव तालुका अध्यक्ष रोहन साळवी यांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळा, उसरघर वाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि स्नेहभोजनाचे अत्यंत उत्साहात वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे.

कार्यक्रमादरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिकांनी रोहन साळवी यांच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रोहन साळवी यांच्या निरंतर सामाजिक कार्याचा गौरव करतानाच मुख्याध्यापिका यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत  पुर्वी त्या देवळी शाळेत असताना  रोहन साळवी यांनी तेथील विद्यार्थ्यांना देखील अशाच प्रकारे शिक्षणासाठी मदत केली आहे असे सांगितले. तसेच त्यांच्या या कार्यात  पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाचेही मुख्याध्यापिकांनी कौतुक करत आभार व्यक्त केले

मुख्याध्यापिकांनी आभार मानल्यानंतर रोहन साळवी यांनी अत्यंत मार्मिक आणि मनाला भिडणारे उत्तर दिले. ते म्हणाले, “मॅडम, माझे आभार मानू नका. ‘आभार’ या शब्दातील ‘आ’ काढला की मागे फक्त ‘भार’ (ओझे) राहतो आणि तो भार तुम्ही माझ्यावर देऊ नका. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी जिथे जिथे माझी गरज लागेल, तिथे मला हक्काने सांगा. मी नेहमीच सडळ हाताने मदत करण्यास तयार असेन.” रोहन साळवी यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रत्येकाची मने जिंकून घेतली.

दरम्यान  रोहन साळवी यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणखी एक मोठी घोषणा केली. शाळेचे रंगकाम उत्तम झाले असले तरी, प्राथमिक शाळेतील मुलांच्या कल्पकतेला वाव मिळण्यासाठी आणि खेळता-खेळता अभ्यास व्हावा म्हणून शाळेच्या भिंती या ‘बोलक्या’ (शैक्षणिक व ज्ञानवर्धक चित्रांनी सजलेल्या) असायला हव्यात, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. या बोलक्या भिंती तयार करण्यासाठी येणारा संपूर्ण खर्च स्वतः करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

या स्तुत्य उपक्रमाप्रसंगी बहुजन वंचित आघाडीचे रोहन साळवी यांच्यासोबत धिरज पवार, प्रेम साळवी, स्वप्निल साळवी, विनु इंगावले यांसह त्यांचा मित्रपरिवार, शिक्षक वृन्द आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांप्रती दाखवलेल्या या आपुलकीबद्दल सर्वच स्तरातून साळवी व त्यांच्या सहकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button