बळी गेल्यानंतर पाटणूस ग्रामपंचायतीला आली जाग; देवकुंड धबधब्यात दोन तरुणांच्या मृत्यूनंतर घाईघाईने लावले बंदीचे बॅनर्स!
प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला तब्बल १२ दिवस केराची टोपली; 'प्रशासक' आणि ग्रामसेवकांचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!

गोरेगांव/रोहिदास नगर ( प्रसाद गोरेगांवकर ) माणगांव तालुक्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या देवकुंड धबधब्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर स्थानिक पाटणूस ग्रामपंचायतीचा ढिसाळ आणि अत्यंत बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे. दोन निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्यानंतर कुठे प्रशासनाला जाग आली असून, शासकीय यंत्रणा आणि पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने घाईघाईने प्रतिबंधात्मक बॅनर्स लावल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, सध्या या ग्रामपंचायतीवर लोकप्रतिनिधी नसून ‘प्रशासक’ राज आहे, त्यामुळे या थेट शासकीय निष्काळजीपणाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पावसाळ्यातील धोके लक्षात घेऊन माणगांव प्रांताधिकाऱ्यांनी १ जुलै २०२६ पासूनच देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हाणी घाट या ठिकाणी कलम १६३ (प्रतिबंधात्मक आदेश) लागू केला होता. या आदेशाची अंमलबजावणी करणे आणि पर्यटकांना सावध करणारे फलक (बॅनर्स) लावणे ही पूर्णपणे स्थानिक पाटणूस ग्रामपंचायतीची जबाबदारी होती. प्रांताधिकाऱ्यांचा आदेश येऊन तब्बल १२ दिवस उलटले, तरी ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि ग्रामसेवकांनी परिसरात एकही फलक लावला नव्हता. सध्या ग्रामपंचायतीचा कारभार थेट शासकीय अधिकाऱ्याच्या (प्रशासक) हातात असतानाही अशी कमालीची अनास्था दाखवली गेली. या अक्षम्य दुर्लक्षामुळेच पर्यटक अनभिज्ञ राहिले आणि धबधब्यात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला.
हृदयद्रावक बाब म्हणजे, जोपर्यंत दुर्घटना घडली नाही, तोपर्यंत सुस्त असलेल्या यंत्रणेला दुर्घटना घडल्यानंतर मात्र अचानक जाग आली. दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी, जेव्हा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते आणि तिथे वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच पोलीस यंत्रणा दाखल होणार होती, नेमकी त्याच वेळी ग्रामपंचायतीची धावपळ उडाली. स्वतःवर कारवाई होऊ नये म्हणून घाईघाईने गावात आणि परिसरात प्रतिबंधात्मक आदेशाचे बॅनर्स लावण्यात आले. जर हे बॅनर्स १ जुलै रोजीच लावले असते, तर कदाचित त्या दोन तरुणांचा जीव वाचला असता. प्रशासक आणि ग्रामसेवक निष्पाप लोकांचा बळी जाण्याची वाट पाहत होते का? केवळ वरिष्ठांना दाखवण्यासाठी हा बॅनर्स लावण्याचा फार्स का केला गेला?
शासकीय आदेशाचे थेट उल्लंघन करणे आणि पर्यटकांच्या सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप आता होत आहे. थेट शासकीय नियंत्रणाखाली (प्रशासक) असलेल्या या ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांवर आणि संबंधित ग्रामसेवकावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आणि सदोष मनुष्यवधाला कारणीभूत ठरल्याबद्दल तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.



