मुंबई-गोवा महामार्गावर थरार! ओव्हरलोड हायवामुळे लोखंडी रेलिंगचा चक्काचूर
प्राधिकरणाकडून मालकावर 'फौजदारी' आणि झालेल्या नुकसानाच्या वसुलीची तयारी?

रोहिदास नगर/गोरेगाव (प्रसाद गोरेगांवकर) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव येथे नियमबाह्य आणि जीवघेण्या जड वाहतुकीचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. क्षमतेपेक्षा कित्येक पटीने अधिक दगडी कोळसा भरून महाडच्या दिशेने चाललेला एम्. एच्. ०६ डी ९५७७ (MH 06 D 9577) क्रमांकाचा हायवा ट्रक तळेगाव परिसरात आला असता, अतिभारामुळे या धावत्या गाडीचा जॉईंट अचानक तुटला. जॉईंट तुटल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि हा अनियंत्रित अजस्र हायवा थेट रस्त्याकडेला सुरक्षेसाठी बसवण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक कठड्यावर (गार्डरेल) जाऊन वेगाने आदळला.
हा अपघात एवढा तीव्र होता की, महामार्गाच्या कडेला असलेल्या लाखो रुपयांच्या लोखंडी रेलिंगचे प्रचंड नुकसान झाले असून ते अक्षरशः दुमडून चक्काचूर झाले आहे. सुदैवाने या भीषण अपघातात हायवा चालक पूर्णपणे सुरक्षित असून त्याला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला असला, तरी या घटनेने महामार्गावरील सुरक्षेचे आणि शासकीय मालमत्तेचे धिंडवडे काढले आहेत.
अपघातानंतर ट्रकचा दर्शनी भाग पूर्णपणे चिरडला गेला असून ट्रकमधील टनवारी दगडी कोळसा महाडच्या दिशेने जाणाऱ्या कडेच्या मार्गावर सांडला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. दरम्यान, अपघातात राष्ट्रीय महामार्गाच्या मालमत्तेचे जे मोठे नुकसान झाले आहे, त्याबाबत आता महामार्ग प्राधिकरण (NHAI) काय पाऊल उचलणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ओव्हरलोडिंगमुळेच हा अपघात घडल्याने प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून अपघातग्रस्त ठिकाणाची पाहणी होऊन झालेल्या नुकसानीचे अधिकृत मूल्यमापन केले जाणार का आणि संबंधित हायवा मालकाकडून या नुकसानीची संपूर्ण वसुली केली जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून दिवस-रात्र नियमांचे उल्लंघन करून धावणाऱ्या ओव्हरलोड जड वाहनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरटीओ (RTO) आणि महामार्ग पोलीस प्रशासनाच्या डोळ्यांदेखत ही जीवघेणी ओव्हरलोड वाहतूक कशी सुरू राहते, असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून आणि प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ थातूरमातूर दंडात्मक कारवाई करून अशा वाहनचालकांना सोडून दिले जात असल्यामुळेच त्यांचे धाडस वाढले असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आणि निष्पाप प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा वाहनांवर व त्यांच्या मालकांवर ‘सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्या’अंतर्गत थेट कडक फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आता संपूर्ण तालुक्यातून जोर धरू लागली आहे.



