लोणेरेतील व्यापाऱ्यांना इशारा! बनावट PhonePe आणि Google Pay अॅपद्वारे आर्थिक फसवणूक; सावध राहण्याचे आवाहन

रोहिदास नगर /गोरेगाव ( प्रतिनिधी) लोणेरे परिसरातील व्यापारी आणि दुकानदारांना लक्ष्य करून बनावट PhonePe आणि Google Pay अॅपच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोशल मिडिया तसेच अनेकांच्या वॉट्अप स्टेटसवर मेसेज प्रसारित करण्यात आले असून, डिजिटल व्यवहार करताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माहितीनुसार, काही भामटे बनावट पेमेंट अॅप किंवा बनावट व्यवहाराची स्क्रीन वापरून व्यापाऱ्यांची दिशाभूल करत आहेत. ग्राहकाने पैसे पाठवल्याचा आभास निर्माण करण्यासाठी मोबाईलवर “Payment Successful” असा बनावट संदेश किंवा स्क्रीन दाखवली जाते. काही वेळा बनावट QR कोडचाही वापर केला जातो. व्यापारी केवळ मोबाईलवरील स्क्रीन पाहून व्यवहार पूर्ण झाल्याचा समज करून ग्राहकाला माल किंवा सेवा देतात. मात्र, प्रत्यक्षात संबंधित रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नसते. त्यामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक फसवणूक होत आहे.
डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होत असताना अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकारही वाढत असल्याने व्यापाऱ्यांनी अधिकृत आणि अद्ययावत UPI अॅपचाच वापर करावा, ग्राहकाने स्वतः त्यांच्या दुकानातील QR कोड स्कॅन करूनच व्यवहार केला आहे याची खात्री करावी आणि केवळ स्क्रीनशॉट किंवा मोबाईलवरील संदेशावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, संबंधित रक्कम प्रत्यक्ष बँक खात्यात जमा झाल्याची खात्री झाल्यानंतरच ग्राहकाला माल अथवा सेवा द्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
याशिवाय, संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने पोलिसांना तसेच परिसरातील इतर व्यापाऱ्यांना माहिती देऊन त्यांनाही सतर्क करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
डिजिटल पेमेंटमुळे व्यवहार सुलभ झाले असले तरी फसवणूक करणारे नवनवीन क्लृप्त्या वापरत असल्याने प्रत्येक व्यापाऱ्याने व्यवहार करताना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. “सतर्क रहा… सुरक्षित रहा… फसवणूक टाळा!” हा संदेश देत व्यापाऱ्यांनी एकमेकांनाही सावध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



