ताज्या घडामोडी

गरीब मुलांच्या शिक्षणासाठी रोहन साळवींचा स्तुत्य उपक्रम; उणेगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप!

रोहिदास नगर/गोरेगांव (प्रसाद गोरेगांवकर )“गरीब आणि होतकरू मुले केवळ साधनांअभावी शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याचे भविष्य उज्वल व्हावे,” याच पवित्र ध्येयाने बहुजन वंचित आघाडीचे माणगाव तालुका अध्यक्ष तथा खंबीर सामाजिक कार्यकर्ते रोहन अशोक साळवी यांनी पुन्हा एकदा समाजकार्याचा आदर्श घालून दिला आहे. उणेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या वतीने शालेय उपयोगी वस्तू आणि शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

रोहन साळवी यांनी स्वतः अत्यंत बिकट आणि गरिबीच्या परिस्थितीतून संघर्ष करत आपले ग्रॅज्युएशन (पदवी) पूर्ण केले आहे. शिक्षणाची वाट चालताना नेमक्या कोणत्या अडचणी येतात, किती कष्ट उपसावे लागतात आणि योग्य साहित्याअभावी ग्रामीण भागातील मुलांची कशी कोंडी होते, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. याच जाणिवेतून, पदाचा किंवा राजकारणाचा विचार न करता, ते सातत्याने वेगवेगळ्या जिल्हा परिषद शाळांना भेटी देत असतात. यापूर्वीही त्यांनी उसरघरवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे शैक्षणिक साहित्याचे वाटप करून मोठा आधार दिला होता.

विद्यार्थ्यांचा अभ्यास खंडित होऊ नये म्हणून इन्व्हर्टर बॅटरीदेण्याची घोषणा!

आज उणेगाव शाळेत साहित्य वाटप करत असताना, ग्रामीण भागातील विजेच्या लपंडावामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोठा खंड पडत असल्याचे रोहन साळवी यांच्या निदर्शनास आले. शाळेत इन्व्हर्टर मशीन उपलब्ध आहे, परंतु बॅटरी नसल्याने ते बंद अवस्थेत होते. विद्यार्थ्यांची ही अडचण पाहून साळवी यांनी तात्काळ इन्व्हर्टरकरिता लागणारी ब्रँडेड बॅटरी स्वखर्चाने देण्याची मोठी घोषणा केली. त्यांच्या या संवेदनशील निर्णयामुळे उपस्थित शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांचे डोळे कौतुकाने भरून आले आणि त्यांनी साळवी यांचे विशेष आभार मानले.

या स्तुत्य उपक्रमादरम्यान शाळेतील शिक्षक, व्यवस्थापन समिती आणि गावातील वासुदेव सत्वे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती) मंगेश शिंदे , स्मरणिका जुमारे (ग्रामपंचायत सदस्या, उणेगाव) कविता चेरफळे,  सानिका सत्वे, शशिकांत हाटे, सूर्यभान शिरसाट, मुकेश भोस्तेकर, अमोल हांगे, संगीता शिगवण तसेच स्वप्निल साळवी, रोहन वसंत साळवी ग्रामस्थ उपस्थित होते.

रोहन अशोक साळवी यांच्या या निरंतर सामाजिक कार्यामुळे ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असून, त्यांच्या या संवेदनशील उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button