ताज्या घडामोडी

म्हाप्रळ-आंबेत पुलाला बार्ज धडकल्याप्रकरणी अखेर ११ दिवसांनी मोठी कारवाई! बार्ज मालकाविरुद्ध मंडणगड पोलिसांत गुन्हा दाखल

रोहिदास नगर / गोरेगांव (प्रसाद गोरेगांवकर) रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य दुवा असलेल्या सावित्री नदीवरील म्हाप्रळ-आंबेत पुलाला बार्जची जोरदार धडक बसल्याप्रकरणी अखेर ११ दिवसांनी मोठी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. हवामान विभागाने अतिवृष्टी आणि सावित्री नदीला पूर येण्याचा स्पष्ट ‘रेड अलर्ट’ दिला असतानाही, सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना न करता अक्षम्य निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत बार्ज मालकाविरुद्ध मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, महाड तालुक्यातील मौजे सापे येथील सर्व्हे क्रमांक ३९/२ लगत MV AL SUBHAANI, MV DULDUL VI आणि MV ZOYA या तीन अवाढव्य बार्जेस नांगरून ठेवण्यात आल्या होत्या. ६ जुलै २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला प्रचंड पूर आला. या पुराच्या वेगवान आणि भयानक प्रवाहामुळे बार्जला बांधलेले दोरखंड तुटले आणि त्यांचे नांगरही वाहून गेले. परिणामी, या तिनही बार्जेस पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेल्या आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहू लागल्या. यातील MV AL SUBHAANI ही बार्ज सुदैवाने म्हाप्रळ-आंबेत पुलाखालून वाहत जाऊन पुढे खाडीकिनारी अडकली. मात्र, MV DULDUL VI आणि MV ZOYA या दोन बार्जेस पहाटे सुमारे ४:३० वाजण्याच्या सुमारास म्हाप्रळ-आंबेत पुलाला अतिशय वेगाने आणि जोरदार धडकल्या. या भीषण धडकेमुळे पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारी मालमत्तेची अतोनात हानी झाली आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, या पुलावरून दररोज हजारो नागरिक प्रवास करत असतात, त्यामुळे या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण झाला होता.

हवामान खात्याचा आणि प्रशासनाचा गंभीर इशारा असतानाही बार्ज मालकाने बार्जेस सुरक्षित स्थळी हलवल्या नाहीत, दोरखंड किंवा नांगराची मजबुती तपासली नाही, अथवा कोणतीही प्रतिबंधात्मक खबरदारी घेतली नाही, असे तपासात स्पष्ट झाले आहे. या बेजबाबदार आणि अक्षम्य निष्काळजीपणामुळेच पुलाचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे काही काळ या मार्गावरील वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला होता.

याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगावचे कनिष्ठ अभियंता ओंकार अशोक शिरगांवकर (वय ३१) यांनी १५ जुलै रोजी मंडणगड पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून बार्ज मालक रशाद अहमद मुजावर (रा. गॉडगिफ्ट टॉवर, हिल रोड, बांद्रा पश्चिम, मुंबई) याच्याविरुद्ध  मंडणगड पोलीस ठाण्यात  १७ जुलै २०२६ रोजी दुपारी १:१७ वाजता गुन्हा क्रमांक ८०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ कलम ३२४(५) आणि २८९ आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, १९८४ कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button