ताज्या घडामोडी

माहिती अधिकारात खोटी माहिती देऊन पी. आय. मारुती पाटील यांना वाचविण्याचा प्रयत्न; रोहा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून पत्रकाराची दिशाभूल?

प्रतिनिधी  – सानेगांव प्रकरणावरून रायगड पोलीस दलात सध्या एकच खळबळ उडाली आहे. रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (पी. आय.) मारुती पाटील यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी तथा माहिती अधिकारी यांना चुकीची व खोटी माहिती पुरविल्यामुळे माहिती अधिकारांतर्गत पत्रकाराला चुकीची माहिती देण्यात आली होती. या गंभीर प्रकारानंतर संबंधित पत्रकाराने पुरावे सादर करूनही पोलीस उपविभागीय अधिकारी रोहा हे जाणूनबुजून पी. आय. मारुती पाटील यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आता होत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सानेगांव येथील एका प्रकरणासंदर्भात एका पत्रकाराने माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. मात्र, रोहा पोलीस ठाण्याचे पी. आय. मारुती पाटील यांच्याकडून माहिती अधिकारी यांना या प्रकरणाची खोटी माहिती देण्यात आली. याच माहितीच्या आधारे माहिती अधिकारी यांनी संबंधित पत्रकाराला चुकीची माहिती पुरविली.

हा प्रकार समोर आल्यानंतर पत्रकाराने थेट पोलीस महासंचालक (DGP) आणि पोलीस अधीक्षक (SP) रायगड यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली. माहिती अधिकारी यांना खोटी माहिती पुरवून दिशाभूल केल्याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी पत्रकाराने केली होती.

महासंचालक कार्यालय आणि पोलीस अधीक्षकांचे आदेश

पत्रकाराच्या तक्रारीची दखल घेत पोलीस महासंचालक कार्यालयातून रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाला याबाबत कळविण्यात आले, तसेच पत्रकाराला मेल पाठवून पुढील माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय अलिबाग येथून घेण्याचे निर्देश दिले.  यानंतर पोलीस अधीक्षक रायगड यांनी रोहा उपविभागीय अधिकारी यांना दि. २०/४/२०२६ च्या ई-४००६४४४/२०२६ दाखल अर्जाप्रमाणे चौकशी व तपासणीचे आदेश दिले होते.

           

उपविभागीय अधिकाऱ्यांकडून विषयाची टाळाटाळ?

पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले असतानाही, पोलीस उपविभागीय अधिकारी रोहा यांनी या गंभीर अर्जावर योग्य कारवाई करण्याऐवजी, संबंधित पत्रकाराने आधी अपील केलेल्या प्रकरणात अपिलीय अधिकाऱ्यांनी जी माहिती देण्यास सांगितली होती, केवळ तेवढीच माहिती पुरवून मूळ तक्रारीला बगल दिली. 

त्यानंतर, पत्रकाराने पुन्हा एकदा वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला. यामध्ये रोहा पोलीस ठाण्याच्या माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली खोटी माहिती आणि याच प्रकरणाशी संबंधित दुसऱ्या शासकीय कार्यालयातून मिळालेली खरी व अधिकृत माहिती, असे दोन्ही दस्तऐवज पोलीस अधीक्षक आणि पोलीस महासंचालक यांना पाठवून पी. आय. पाटील यांनी कशी खोटी माहिती दिली याचे थेट पुरावे सादर केले.

पुन्हा एकदा तेच पत्र देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न

पुरावे समोर आल्यानंतर रोहा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून कडक कारवाईची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी दि. १९/६/२०२६ रोजी पुन्हा तेच जुने पत्र देऊन पत्रकाराची दिशाभूल केली आहे.

         

“माहिती अधिकारात खोटी माहिती देणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेले असणे, हे दोन्ही विषय पूर्णपणे वेगवेगळे आहेत. असे असतानाही, पोलीस उपविभागीय अधिकारी तथा माहिती अधिकारी हे केवळ आणि केवळ पी. आय. मारुती पाटील यांना कायदेशीर कारवाईपासून वाचविण्यासाठीच जाणूनबुजून या प्रकरणाचा तपास भरकटवत आहेत व टाळाटाळ करत आहेत,” असा थेट आरोप संबंधित पत्रकाराने केला आहे.

आता या संपूर्ण प्रकरणात पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षक रायगड हे या दोन्ही अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button