माणगाव काळ नदीवरील नवीन पूल धोक्याच्या उंबरठ्यावर!
महिनाभरातच भराव खचल्याने महामार्गावरील पुलावर पडल्या भेगा; मोठ्या अपघाताची भीती

गोरेगांव / रोहिदास नगर ( प्रसाद गोरेगांवकर ) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव येथील काळ नदीवर बांधण्यात आलेला नवीन पूल अवघ्या एका महिन्यातच धोक्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पुलाचा भराव खचल्यामुळे महामार्गावर मोठ्या भेगा पडल्या असून, या ठिकाणी कोणत्याही क्षणी भीषण अपघात होण्याची दाट भीती व्यक्त केली जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही महिनाभरातच पुलाची अशी दुरवस्था झाल्याने ‘शिंदे डेव्हलपर्स’ या कंपनीच्या कामाच्या दर्जावर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ब्रिटीशकालीन पुलाला पर्याय, पण महिनाभरातच भ्रष्टाचाराचा ‘भराव’ खचला!
माणगाव येथील काळ नदीवर असलेला ब्रिटीशकालीन पूल १०० वर्षांहून अधिक जुना आणि अत्यंत कमकुवत झाला होता. या धोक्याच्या पुलाला पर्यायी व्यवस्था म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी नवीन पूल मंजूर केला होता. या पुलाचे काम ‘शिंदे डेव्हलपर्स’ या कंपनीकडून करण्यात आले असून, काही दिवसांपूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.

मात्र, या वर्षाच्या पहिल्याच पावसाळ्याच्या अवघ्या काही दिवसांच्या वाहतुकीतच पुलाचा मुख्य भराव खचू लागल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रस्त्याला गेलेल्या मोठ्या भेगांमुळे पुलाच्या मजबुतीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाहनचालक मृत्यूच्या छायेत; ‘शिंदे डेव्हलपर्स’वर कारवाई होणार का?
महामार्गावर पडलेल्या या भेगांमुळे विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रस्ता अंदाज येत नाही त्यात पावसाचा जोर वाढलेला असल्याने वेगवान गाड्यांना या भेगा तसेच पडलेल्या खड्यांमुळे अनियंत्रित होऊन मोठ्या अपघाताची मालिका सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्रिटीशकालीन पूल १०० वर्षे टिकला, मात्र आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवलेला नवीन पूलाचे काम/ भराव महिनाभरही टिकू नये, यावरून कंत्राटदार कंपनीने कामात मोठा हलगर्जीपणा आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
📢 संतप्त वाहनचालक आणि नागरिकांचा सवाल
“शंभर वर्षांचा जुना पूल अजूनही उभा आहे आणि महिन्यापूर्वी बांधलेला पूल खचायला लागला. हा थेट जनतेच्या पैशांचा अपव्यय आणि प्रवाशांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे. या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे आणि शिंदे डेव्हलपर्सला काळपटलीत टाकले पाहिजे.”
मुख्य सवाल: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ढिम्म का?
अवघ्या महिन्याभरात पुलाची झालेली ही दुरवस्था राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांच्या डोळ्यांना दिसत नाही का? एखादा मोठा अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल आता रायगडकरांकडून विचारला जात आहे. संबंधित कंत्राटदाराकडून तातडीने पुलाची दुरुस्ती करून न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे



