ताज्या घडामोडी

महाडच्या ‘तारीक गार्डन’ दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली! गोरेगावात २६ कुटुंबांचा जीव वाचला

पोलीस आणि प्रशासनाच्या सतर्कतेमुळे  अनेकांच्या जीव वाचले

गोरेगाव / रोहिदास नगर ( प्रसाद गोरेगांवकर ) रायगडमधील महाड येथील भीषण ‘तारीक गार्डन’ दुर्घटनेसारखीच थरारक आणि तितकीच धक्कादायक घटना आज गोरेगाव येथे घडली. गोरेगावमधील ‘अलहसन’ इमारतीचा मुख्य कॉलम अचानक कोसळण्याच्या स्थितीत आल्याने येथे राहणाऱ्या तब्बल २६ कुटुंबांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. सुदैवाने वेळीच हा प्रकार उघडकीस आल्याने मोठी जीवितहानी टळली असून प्रशासनाने तात्काळ मोठी कारवाई केली आहे.

प्रशासनाकडून इमारत रिकामी; वीज पुरवठा खंडित

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणेने तातडीने युद्धपातळीवर कारवाई केली. इमारतीमधील सर्व २६ कुटुंबांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून, सुरक्षेचा उपाय म्हणून इमारतीचे विद्युत कनेक्शन (Electricity) कट करण्यात आले आहे. दुर्घटना टाळण्यासाठी सध्यातरी कोणालाही या इमारतीत जाण्यास सक्त मज्जाव (प्रतिबंध) करण्यात आला आहे.

२०१२ ची इमारत १४ वर्षांतच पडण्याच्या स्थितीत! बिल्डरचा मनमानी कारभार

रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत २०१२ मध्ये बिल्डर अब्दुला सरखोत याने बांधली होती. अवघ्या १४ वर्षांतच इमारत पत्त्यांसारखी कोसळण्याच्या स्थितीत आल्याने बांधकामाच्या निकृष्ट दर्जाबाबत संताप व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या इमारतीला केवळ जी प्लस तीन (G+3) मजल्यांची परवानगी असताना, बिल्डरने नियम धाब्यावर बसवून ४ थ्या मजल्याचे जबरदस्तीने बांधकाम केले होते. याच अतिभारामुळे (Overloading) आज इमारतीचा मुख्य खांब (कॉलम) पूर्णपणे वाकला असल्याचे बोलले जात आहे.

दरमहा ५०० रुपये मेंटेनन्स, तरीही दुरवस्था!

इमारतीमधील रहिवाशांकडून दरमहा ५०० रुपये देखभाल शुल्क (Maintenance) नियमित वसूल केले जात होते. असे असतानाही इमारतीची अशी दुरवस्था का झाली? आणि गोळा केलेला निधी नेमका कुठे गेला? असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत.

प्रशासकीय उदासीनता की फक्त नोटिसांचा खेळ?

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, ग्रामपंचायतीकडून या इमारतीला दरवर्षी ‘धोकादायक इमारत’ म्हणून केवळ कागदोपत्री नोटिसा बजावल्या जात होत्या. मात्र, अनधिकृत मजल्याचे बांधकाम आणि निकृष्ट दर्जा माहीत असूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. प्रशासनाच्या या केवळ ‘नोटिसांच्या खेळा’मुळेच आज २६ कुटुंबांचे आयुष्य रस्त्यावर आले आहे.

तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी 

या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण आहे. या इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करण्यात यावे, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर कठोर गुन्हा दाखल व्हावा आणि रहिवाशांच्या कायमस्वरूपी सुरक्षिततेसाठी व पुनर्वसनासाठी ठोस पावले उचलली जावीत, अशी तीव्र मागणी गोरेगावच्या नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button