ताज्या घडामोडी

पर्यटकांच्या जीवाशी खेळणारे ‘इन्स्टा-माफिया’ पोलिसांच्या जाळ्यात! देवकुंड दुर्घटनेनंतरही ‘रील्स’च्या नावाखाली मृत्यूचा बाजार मांडणाऱ्या ७ इंस्टाग्राम हँडल्सवर गुन्हे दाखल!

रोहिदास नगर/गोरेगांव (प्रसाद गोरेगांवकर) : देवकुंड धबधब्यावर पर्यटकांचा बळी गेल्यानंतरही प्रशासनाला न जुमानता सोशल मीडियावर केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी’ आणि ‘लाईक्स-फॉलोअर्स’च्या हव्यासापोटी निष्पाप पर्यटकांच्या जिवाशी खेळणाऱ्या ७ इंस्टाग्राम अकाउंट धारकांना माणगाव पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून प्रतिबंधित क्षेत्रात ‘सिक्रेट पॉईंट’च्या नावाखाली मृत्यूचा सापळा रचणाऱ्या या ‘इन्स्टा-माफियांवर’ माणगाव पोलीस ठाण्यात थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पावसाळ्यात देवकुंड धबधबा, सणसवाडीचा सिक्रेट पॉईंट आणि ताम्हाणी घाट हे मृत्यूचे हॉटस्पॉट बनतात. म्हणूनच प्रशासनाने १ जुलै २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत या संपूर्ण परिसरात रील्स बनवणे, ड्रोन उडवणे, चित्रीकरण करणे आणि ट्रिप्स आयोजित करण्यावर कडक प्रतिबंधात्मक आदेश (कलम १६३ BNSS) लागू केले आहेत. परंतु, कायद्याची कोणतीही भीती नसलेल्या काही ट्रेकिंग ग्रुप्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जुने आणि थरारक व्हिडिओ पोस्ट करून आगामी ट्रिप्सचे बुकींग सुरू” असल्याच्या जाहिराती ठोकल्या. धबधब्याच्या कड्यावर उभे राहून रील्स बनवायचे आणि त्यातून लाखो रुपयांची कमाई करायची, असा हा सरळ-सरळ मृत्यूचा बाजार’ सुरू होता.

या सोशल मिडियावरील रिल्स बघूनच पर्यटक देवकुंड कडे आकर्षित होतात  या सर्व बाबी लक्षात घेऊन माणगाव पोलीसांनी या सोशल मीडिया अकाऊंट्सवर करडी नजर ठेवली असून या अकाऊंट्सनी केवळ आदेशाचा भंगच केला नाही, तर पर्यटकांना धोक्याच्या ठिकाणी येण्यासाठी चिथावणी  दिल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २२३ आणि ४५ अन्वये गुन्हा  नोंदवला आहे.

हे आहेत ते गुन्हेगार इंस्टाग्राम अकाऊंट्स 

१. sahyadrikkers
२. parvat_mastake
३. wonder_walkers
४. Zestwanders
५. dongaryatra.official
६. camp_india_pune
७. eco_pandhari

या गुन्ह्याचा तपास आता थेट पोलीस हवालदार प्रदीप घोडके यांच्याकडे सोपवण्यात आला असून, या सर्व अकाउंट धारकांचे मोबाईल नंबर आणि डिजिटल पुरावे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच “लाइक आणि पैशांसाठी पर्यटकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा छुप्या एजंटांची गय केली जाणार नाही. पर्यटकांनीही अशा बेकायदेशीर आणि जीवघेण्या ट्रिप्सच्या जाहिरातींना बळी पडू नये, अन्यथा त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येईल असा सजड इशाला पोलीसांकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button