ताज्या घडामोडी

महामार्ग की मृत्यूचा सापळा?

NH 66 वर वाहनचालकांचा जीव मुठीत; प्राधिकरणाचा कोडगेपणा चव्हाट्यावर!

गोरेगांव / रोहिदास नगर (प्रसाद गोरेगांवकर ) दशकाहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH 66) ने या वर्षीच्या पावसाळ्यातही वाहनचालकांच्या पाचवीला पूजलेला मरणयातनांचा फेरा कायम ठेवला आहे. मान्सूनचे आगमन होताच महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचून अक्षरशः तळ्यांचे स्वरूप आले आहे.

या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना जीवघेणी ‘तारेवरची कसरत’ करावी लागत आहे. ‘गतिमान महाराष्ट्रात’ वाहनचालकांच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अक्षम्य आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

 पावसाच्या सुरुवातीलाच रस्त्यांना तळ्यांचे स्वरूप, 

‘हायड्रोप्लानिंग’मुळे गाड्या फिरून मोठ्या अपघाताची भीषण शक्यता

महामार्गावर पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये आणि सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. अशा पाण्यातून भरधाव वाहन गेल्यास टायरचा रस्त्याशी असलेला संपर्क तुटून हायड्रोप्लानिंगमुळे गाडी अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन गोल फिरु शकते . यामुळे पाठीमागून येणाऱ्या किंवा शेजारून जाणाऱ्या इतर वाहनांचा भीषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

२ ते ४ जुलै दरम्यान ‘रेड अलर्ट’; महामार्ग ठरणार का मृत्यूचा सापळा?

भारतीय हवामान विभागाने २ ते ४ जुलै दरम्यान रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकण भागात अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या कालावधीत नद्या-नाल्यांना पूर येण्याची आणि घाट परिसरात दरडी कोसळण्याची शक्यता आहे. आधीच दुरवस्था झालेल्या या महामार्गावर जर पावसाचा जोर वाढला, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आणि महामार्ग प्राधिकरणाने तातडीने युद्धपातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जनतेचा संतप्त सवाल: ‘प्राधिकरण ढिम्म का?’

“आम्ही प्रामाणिकपणे टोल आणि कर भरतो ते रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बुडून मरण्यासाठी का? कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या साट्यालोट्यामुळे सर्वसामान्यांचा जीव टांगणीला लागला आहे. एखादा मोठा अनर्थ घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?” असा जळजळीत सवाल स्थानिक नागरिक आणि संतप्त वाहनचालक विचारत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button