देवकुंडनंतर आता सुधागडात दुर्घटना! नागशेत-कोशिंबले धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू
पर्यटकांचा अल्लडपणा जीवावर; दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शेलार मामा रेस्क्यू टीमला मृतदेह शोधण्यात यश!

रोहिदास नगर / गोरेगाव (प्रसाद गोरेगावकर): देवकुंड धबधब्यावर घडलेल्या भीषण दुर्घटनेची शाई वाळते न वाळते तोच, रायगड जिल्ह्यात पर्यटकांच्या बेफिकिरीमुळे आणखी एका निष्पाप पर्यटकाचा बळी गेल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सुधागड तालुक्यातील नागशेत-कोशिंबले हद्दीतील धबधब्यावर मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या ४५ वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. देवकुंड दुर्घटनेतून कोणताही बोध न घेता पर्यटकांकडून होणारी जीवघेणी मस्ती पुन्हा एकदा उघड झाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुधागड तालुक्यातील नागशेत-कोशिंबले हद्दीत असलेल्या धबधब्यावर चार मित्र निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी गेले होते. धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात उतरलेले असताना, अचानक ४५ वर्षीय इसमाचा पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक रेस्क्यू टीम आणि ‘शेलार मामा आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम’ तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि जिवाची बाजी लावून शेलार मामांच्या टीमने बुडालेल्या इसमाचा मृतदेह शोधून पोलिसांच्या स्वाधीन केला.
🚨 “पाण्यासोबत खेळ करू नका!” – शेलार मामा आपत्ती व्यवस्थापनाचे कळकळीचे आवाहन
या घटनेनंतर ‘शेलार मामा रेस्क्यू टीम’ने पर्यटकांना अत्यंत महत्त्वाचा इशारा व आवाहन केले आहे:
“पर्यटकांनी आणि अल्लड तरुणांनी निसर्गाच्या सानिध्यात जाताना स्वतःच्या जिवाचे भान ठेवून पर्यटनाचा आनंद घ्यावा. अतिउत्साहात किंवा मद्यधुंद अवस्थेत पाण्यात उतरून मस्ती करू नये. पाण्याचा अंदाज न घेता केलेला खेळ थेट प्राणावर बेतू शकतो. देवकुंड धबधबा आणि नागशेत दुर्घटनेतून सर्व पर्यटकांनी त्वरित धडा घेणे गरजेचे आहे.”
एकीकडे देवकुंड धबधब्यावर पर्यटकांवर, गाईड्सवर आणि रील्स बनवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत; तर दुसरीकडे जिल्ह्यातील इतर धोकादायक धबधब्यांवर पर्यटक अजूनही सुरक्षेचे सर्व नियम पायदळी तुडवत मोकाट फिरत आहेत. केवळ कागदोपत्री बंदी आणि गुन्हे दाखल करून दुर्घटना थांबणार नाहीत, तर पर्यटकांनी स्वतःमध्ये शिस्त आणणे आणि स्थानिक प्रशासनाने सर्वच धोकादायक धबधब्यांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करणे ही काळाची गरज बनली आहे.



