समाजरत्न पुरस्काराने राकेश तुपट यांचा गौरव; माणगाव तालुक्याचा अभिमान उंचावला
समाजसेवा, संघटन कौशल्य आणि जनहितासाठीच्या उल्लेखनीय कार्याची दखल; श्री पानबुडी देवी कलामंच, मुंबईकडून सन्मान.

माणगाव (चांदोरे) नंदकुमार चांदोरकर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील चांदोरे ग्रामपंचायत हद्दीतील नळेफोडी गावचे सुपुत्र तथा समाज उन्नती संघ चांदोरे ग्रुप क्र. ५ चे ज्येष्ठ समाजसेवक मा. राकेशजी तुपट यांना “श्री पानबुडी देवी कलामंच, मुंबई” आयोजित “समाजरत्न पुरस्कार २०२६” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. समाजसेवा, प्रभावी संघटन कौशल्य आणि जनहितासाठी केलेल्या निस्वार्थ कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे माणगाव तालुका, चांदोरे पंचक्रोशी, नळेफोडी गाव तसेच संपूर्ण कुणबी समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
संघर्षमय परिस्थितीतून स्वतःचे कर्तृत्व घडवणारे राकेश तुपट यांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईच्या कष्टातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही मुंबईत जाऊन विविध कामे करत त्यांनी स्वतःचे आयुष्य उभे केले. मात्र, या प्रवासात समाजसेवेची ओढ त्यांनी कधीही सोडली नाही.
मुंबईतील विलेपार्ले येथे वास्तव्यास असताना त्यांनी शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेतून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. त्यानंतर विविध सामाजिक आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत त्यांनी लोकाभिमुख नेतृत्वाची ओळख निर्माण केली. गोरगरीब, गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी ते नेहमीच तत्पर राहिले असून, निस्वार्थ समाजकार्यामुळे त्यांनी जनमानसात वेगळे स्थान मिळवले आहे.
राकेश तुपट यांनी कुणबी समाजोन्नती संघ, चांदोरे ग्रुप क्र. ५, मुंबईचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कार्य केले असून, सध्या ते माणगाव तालुका कुणबी समाजाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच महाराष्ट्राचे मंत्री भरतशेठ गोगावले यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेना माणगाव तालुका संपर्क प्रमुख म्हणूनही ते प्रभावी नेतृत्व करत आहेत.
मुंबई येथे पार पडलेल्या गौरव सोहळ्यात अभिनेता सचिन काळे, श्री पानबुडी देवी कलामंचचे अध्यक्ष रमेश भेकरे आणि सचिव दिपक कारकर यांच्या हस्ते राकेश तुपट यांना “समाजरत्न पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह नळेफोडी गावातील दिलीप तुपट, संतोष तुपट, काशिनाथ तुपट, आर्यन तुपट, संतोष लाड, आदेश बाईत, दिपक पवार, पांडुरंग शिंदे, महादेव पवार, गणेश पवार यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राकेश तुपट यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या दीर्घकालीन निस्वार्थ समाजकार्याचा गौरव असून, समाजातील नव्या पिढीला समाजहित आणि जनकल्याणासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



