मोर्बा येथे वीज चोरीचा प्रकार उघड; 24,600 युनिट विजेचा अनधिकृत वापर
महावितरणच्या पथकाची कारवाई; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

रोहिदास नगर /गोरेगांव (प्रसाद गोरेगांवकर) माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे महावितरणच्या तपास पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका आईस्क्रीम दुकानातून तब्बल 24,600 युनिट विजेचा अनधिकृत वापर करण्यात आल्याचा आरोप असून, संबंधित दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणचे सहाय्यक अभियंता सचिन बाबुराव यादव (वय 45) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ते जून 2026 पासून माणगाव सब डिव्हिजनमध्ये कार्यरत आहेत. दिनांक 16 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 12.10 वाजता मोर्बा गावात वीज तपासणी मोहिम राबविण्यात आली होती.
तपासणीदरम्यान फातिमा मंजिल बिल्डिंगमधील ‘अमूल आईस्क्रीम’ नावाच्या दुकानात अनियमितता आढळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दुकानातील वीज मीटरची तपासणी करताना मीटरमधील आऊटगोईंग वायर काढून थेट इनकमिंग टर्मिनलला जोडणी करण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे मीटर वगळून थेट वीज वापर करून वीज चोरी केली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. तपास पथकाने घटनास्थळी पंचनामा केला असून, दुकानात एक पाण्याचा चिलर, चार साधे फ्रिज, एक एसी तसेच सुमारे 7 किलोवॅट क्षमतेचा विजेचा वापर सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
महावितरणच्या अहवालानुसार, 1 जुलै 2025 ते 16 जुलै 2026 या कालावधीत संबंधित मीटर क्रमांकावरून अंदाजे 24,600 युनिट विजेचा वापर झाला असून, त्यामधून सुमारे ₹5 लाख 20 हजार रुपयांचे वीज बिल नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणी तन्वीर अहमद जळगावकर (वय 45) आणि अब्दुल लतीफ अली होलेकर (वय 65) या दोघांविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम, 2003 च्या कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कागदपत्रांमध्ये घटनास्थळ पंचनामा, मीटर जप्ती पंचनामा तसेच वीज चोरी संदर्भातील छायाचित्रे जोडण्यात आल्याचे नमूद आहे. पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुरज फटाडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.



